पिंपरी : मेट्रोमनी साईटवर ओळख झाल्यानंतर वेगवेगळी आमिषे दाखवून, करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी पुणे, गुडगाव आणि बेंगलोर येथील तब्बल २५५ तरुणींना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून आता प्रयत्न चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
निशांत रमेशचंद्र नंदवाना आणि विशाल हर्षद शर्मा अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघे आरोपी मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन तरुणींशी ओळख करायचे. प्रेमाच्या आणि लग्नाच्या शपथा घेऊन तरुणींचा विश्वास संपादन करून त्यांचे लैंगिक शोषण करून आणि लाखो रुपये घेऊन दोघे ही पसार होत होते. दीड कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचं पुढे येत आहे. गंभीर बाब म्हणजे अनेक मुलींचे आरोपींनी लैंगिक शोषण केले असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात एक तक्रारही पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणीची आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषण झाल्याची तक्रार दाखल झाली होती. वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी याची गंभीर दखल घेत तपासाची सूत्रे हलवली.
पीडित तरुणी आणि आरोपींची ओळख मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन झाली होती. गंभीर बाब म्हणजे त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून कारमध्ये जबरदस्तीने बलात्कार केल्याची माहिती पुढे आली आहे. या दोघांनी असे अनेक गुन्हे केल्याची माहिती समोर आली.
वाकड पोलिसांनी माहिती काढली असता आरोपी बेंगलोर येथे असल्याचे समजले. वाकड पोलीस पथक बेंगलोर येथे रवाना झाले. मात्र त्या ठिकाणी हे दोघे वेगळ्याच नावाने वास्तव करत असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. पोलिसांनी ‘डिलिव्हरी बॉय’चे वेषांतर करुन दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून, प्रेमाच्या गोष्टी करत एक नव्हे तर तब्बल शेकडो तरुणींना फसवल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांकडून १५ लाख रोख रक्कम, महागड्या गाड्या आणि किंमती वस्तू असा ७० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, संतोष पाटील (गुन्हे), तपासी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, बालाजी ठाकूर, उपनिरीक्षक संगीता गोडे, अंमलदार दीपक भोसले, विक्रम कुदळ, विभीषण कण्हेरकर, शाम बाबा, नूतन कोंडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.