अहमदनगर : आर्यन खान याच्यासंदर्भात न्यायालयाने दिलेले आदेश अद्याप मी सविस्तर वाचलेले नाहीत. मात्र न्यायालयाने आर्यन खानला ‘क्लीनचिट’ दिली असेल तर केंद्रीय तपास संस्थेने हे प्रकरण कशासाठी घडवले गेले, याची चौकशी करावी लागेल, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे आयोजित कार्यक्रमासाठी गृहमंत्री दिलीप वळसे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. नगर शहरातील बायोडिझेलच्या तस्करीच्या तपासामध्ये आपण लक्ष घालू व योग्य त्या सूचना देऊ, असेही त्यांनी सांगितले.
वळसे म्हणाले, की मी कोणत्या पक्षाचे नाव घेणार नाही, परंतु आर्यन खानच्या प्रकरणात केंद्रीय तपास संस्थांनी ‘वेगळ्याच प्रकार’ची कामगिरी केली आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करावी लागेल. केंद्रीय तपास संस्थांचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो आहे. विदेशी मद्याला करसवलत दिल्याच्या विषयावर बोलण्यास मात्र त्यांनी हा आपला विषय नाही, असे सांगत नकार दिला.