मुंबई : ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नेमले जाते. ज्या विचारांचे केंद्रात सरकार आहे, त्याच विचारांचे लोक राज्यावर नेमले जातात. त्यांची कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे केंद्राने हे सँपल पुन्हा बोलावून घ्यावे अन्यथा, आम्ही आमच्या पद्धतीने याचा निषेध करु किंवा आंदोलन करु, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केंद्राला दिला आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर उद्धव ठाकरे बोलत होते.
आम्ही केंद्राच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत. राज्यपालांना हटविण्यासाठी विविध पक्षातील लोकांनी एकत्र यावे. केंद्राने राज्यपालांना हटविले नाही, तर आम्ही महाराष्ट्र बंद करु, असा इशारा देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला आहे. राज्यपालांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोणाचा हात आहे, याचा शोध घ्यावा लागेल. राज्यपाल हा नि:पक्ष असावा, तो सर्वसमावेशक असावा. राज्यात कोणताही पेचप्रसंग निर्माण झाल्यास राज्यपालांनी तो सोडवावा. पण, आपले राज्यपाल तसे काही न करता, मनाला येईल ते बोलत सुटतात. आता राज्यपालांच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. मागे देखील त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचा असाच अपमान केला होता, असे यावेळी ठाकरे म्हणाले.
भाजपचा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा त्यांच्या पक्षाचा राजकीय कार्यक्रम आहे का, असा प्रश्न मला पडतो. आता जर का राज्यपालांना हटविले गेले नाही, तर महाराष्ट्रद्रोह्यांचा विरोध करण्यासाठी आपण एकत्र येऊया. वेळ आली तर महाराष्ट्र बंद ठेऊ. शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंद करुया. पण राज्यपालांचा निषेध झालाच पाहिजे. महाराष्ट्र हा लेचापेच्यांचा नाही, हे केंद्राला दाखवून देऊ. त्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावे, असे यावेळी ठाकरे म्हणाले.