भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरीतील भूखंड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने इसीआयआर नोंदविला आहे. या प्रकरणी खडसे यांनी 15 जानेवारी रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली होती. तब्बल सहा तास त्यांची चौकशी सुरू होती. खडसेंनी इसीआयआर रद्द करावे, सुनावणी प्रलंबित असेपर्यंत तपास यंत्रणेला कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती.
सोमवारच्या सुनावणीत खडसे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, याचिका दाखल करून घेण्यावर ईडीने घेतलेला आक्षेप वैध नाही. ईडी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत आहे. खडसे कदाचित सुरू असलेल्या कार्यवाहीत आरोपी नसतील. मात्र, नोंदविलेल्या गुन्ह्याचा आणि इसीआयआरच्या तपासाचा विषय एकच आहे. तेच प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे गुन्ह्यात अडकवले जाऊ शकते. निकालानुसार, आरोपीला अटक करताना त्याला कोणत्या गुन्ह्याखाली अटक केले जात आहे, हे सांगणे बंधनकारक आहे. याचिकाकर्त्यांना पीएमएलए अंतर्गत अटक होण्याची भीती आहे, असे न्यायालयाने म्हटले.