मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालात धक्कादायक निकाल लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले होते. सहाव्या जागेसाठीची लढत चुरशीची झाली. यामध्ये भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही या निकालावर परखड मत व्यक्त केले आहे. संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर उलटे झाले असते, संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते, असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे.
छगन भुजबळ यांनी परखड मत व्यक्त करताना संजय राऊत यांना सल्ला देखील दिला आहे. संजय राऊत यांनी आता अपक्षांची नाव घेऊन त्यांना दुखवण्यापेक्षा लोकांना जवळ करावं असं ते म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भुजबळ पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र दुर्दैवाने चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. पण महाविकास आघाडीला हा मोठ्ठा धक्का आहे असे नाही, आमच्याकडे 166 पेक्षा जास्त आमदार होते. आम्ही नियोजनात चुकलो, अशी स्पष्ट कबुली भुजबळ यांनी दिली.
मतांची व्यवस्था करण्यात आम्ही कमी पडलो. भाजपने दोन उमेदवारांना 48 – 48 मते दिली. पहिल्या फेरीनंतर ज्याला जास्त मतं आहेत, त्यांची मत इतरांना ट्रान्सफर होतात. भाजपची मते ट्रान्सफर झाली, आमची मते ट्रान्सफर होण्याचा योगच आला नाही. संजय राऊत यांनाच अडचण निर्माण होते का ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महत्वाच्या नेत्यांना आधी सेफ करायला पाहिजे होते. आम्ही 170 पेक्षा 180 मतांची व्यवस्था करायला पाहिजे होती, यामध्ये आम्ही कमी पडलो, असेही भुजबळ यांनी सांगितले.
फडणवीस लोकांना जवळ करण्यात यशस्वी ठरले. पवार साहेबांचे मार्मिक स्टेटमेंट आले आहे, देवेंद्र फडणवीस अधिक लोकांना जवळ करण्यात यशस्वी ठरले. याचा दुसरा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घेतला पाहिजे. अधिक लोक जवळ केली पाहिजेत. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती. नाराजी निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे. महाविकास आघाडीचा आमदार आपल्याच पक्षाचा असतो, असे समजून काम करायला पाहिजे. आमदार दुखावला जाणार नाही, त्यांच्या कामात अडथळा होणार नाही, याची शिकवण आम्हाला मिळाली आहे, अशी कबुली छगन भुजबळ यांनी दिली.