पिंपरी : शहरात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी पोलीस सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करतात. मात्र अनेकदा ही कारवाई फक्त कागदोपत्रीच असते असे दिसते. वारंवार यावरून पोलिसांवर टीका होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस ऍक्शन मूड मध्ये आले आहेत. शहरातील तडीपार गुंडांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि.6) पहाटे शोध मोहीम राबवली. पोलिसांनी एकाच रात्रीत २०७ तडीपार गुन्हेगारांचे लोकेशन चेक केले. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
तडीपार केलेला गुन्हेगार शहरात आहे का, तडीपार नंतर दिलेल्या ठिकाणीच राहत आहे, याची अचानक तपासणी करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घेतला. परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 मधील स्थानिक पोलिसांच्या मदतीला गुन्हे शाखेच्या टीम देखील सोबत देण्यात आल्या.
एका तडीपार गुंडाचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस नियुक्त करण्यात आले होते. बुधवारी पहाटे बारा ते दोन वाजताच्या दरम्यान तडीपार गुंडांच्या घरी तपासणी करण्यात आली. बहुतांश तडीपार गुंड घरी मिळून आले नाहीत. यामुळे पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर फोन करून फोटोसह करंट लोकेशन मागविले. यापैकी काही तडीपार गुंड यांचे लोकेशन मिळून आले नाही. यामुळे त्या कालावधीमध्ये ते तडीपार गुंड कुठे होते? याचा तपास आता पोलिस तांत्रिक माहितीच्या आधारे घेणार आहेत.
परिमंडळ एकच्या हद्दीत 92 तडीपार गुंड असून परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये 115 तडीपार गुंड आहेत. परिमंडळ दोनमध्ये एक तडीपार गुंड यात घरी मिळून आला असून त्यांच्यावर भा. दं. वि. कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाई मुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.