मुंबई : उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ असं मोठं विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पूजेसाठी दीपक केसरकर यांनीदेखील हजेरी लावली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. आजुबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावं असा सल्लाही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर तुमची काय भूमिका असेल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्ही आता भाजपासोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झालं आहे. आता या कुटुंबामधून परत जायचं असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल”.
जे घडलं त्यासाठी जबाबदार आहेत त्यांना पक्षातून काढू नका, पण थोडं तरी बाजूला ठेवा असा सल्लाही दीपक केसरकर यांनी यावेळी दिला. “अनेक लोक असे आहेत जे आम्ही कामं घेऊन जायचो तेव्हा आमच्याकडे ही कामं द्या, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतो असं म्हणायचे. त्यासाठी आम्ही आमदार झालेलो नाही. आमचे मुख्यमंत्री आमचे प्रतिनिधी असतात. त्यांच्या हातात अर्ज दिल्यानंतर आम्हालाही योग्य व्यक्तीच्या हातात सोपवल्याचं समाधान मिळतं. कोणीतरी एजंट मधे य़ेऊन आमच्याकडे द्या सांगत असेल तर त्याला अधिकार नाही, तो फक्त मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे,” असंही केसरकर म्हणाले.