हिशोब चुकता करण्याची भाषा करत असाल तर आमची तयारी आहे : शिवेंद्रसिंहराजे भोसले

0

सातारा : हिशोब चुकते करण्याची भाषा शशिकांत शिंदे यांनी करू नये. मी तुमचे आव्हान स्वीकारले आहे. यापुढे दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका.  यापुढे तुमची दहशत, गुंडगिरी जावळी तालुका चालू देणार नाही. तुमच्या पराभवाला तुमची गुंडगिरीच जबाबदार आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

सोनगाव (ता. जावळी) येथे जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कार सोहळ्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. सातारा येथे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या पराभवाला शिवेंद्रसिंहराजे भोसले जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार प्रतिउत्तर देत शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली.

भोसले म्हणाले, ‘‘शशिकांत शिंदे केवळ बगलबछ्यांच्या आणि त्यांच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या राजकारणामुळे या निवडणुकीत पराभूत झाले. रांजणे यांच्या विजयामुळे जावळीत नवी सुरुवात झाली आहे. यापुढे मी जावळी तालुक्यातील सर्व निवडणुका कोणतीही राजकीय तडजोड न करता मोठ्या ताकदीने त्यांच्याविरोधात लढणार आहे. रांजणे यांचा विजय हा जावळीतील मतदारांनी ठरवून केलेला विजय आहे.’’

पक्षवाढीसाठी पक्षाच्या चौकटीत राहून काम केले म्हणता आणि दुसरीकडे पक्षातच गटबाजी करून पाडपाडीचे धंदे करता. राजेशाही थाटाचा आमच्यावर आरोप केला गेला. मात्र, प्रत्यक्षात शिंदेसाहेब राजेशाही थाट तर तुमचा मोठा आहे. आम्ही सर्वसामान्य आहोत आणि तुम्हीच स्वतः राजेशाही थाटात राजकारण करत आहात. तुमच्या राजेशाहीचा अतिरेक झाला. यामुळेच तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले.

स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे, असले धंदे आता बंद करा. वस्तुस्थिती स्वीकारा, असेही ते म्हणाले. जावळी तालुक्यात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे या लढाईत काहीही झाले तरी आता तडजोड करणार नाही. दोन हात करण्याची तयारीही ठेवली आहे, असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे यांनी शशिकांत शिंदे यांना दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.