मुंबई : मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी रविवारी दहिसरमधील एका कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने सुर्वे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आपण गाफील राहायचे नाही, यांची जागा दाखवून दिल्याशिवाय अपण गप्प बसायचे नाही, कुणी अरे केले तर आपण कारे करायचे, कुणाची दादागिरी सहन करायची नाही, इथ प्रकाश सुर्वे बसलाय कोण काय करतंय ते बघायला असे म्हणताना ठोकून काढा, हात नाही जमला तर तंगडी तोडा दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देतो. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही मात्र, कुणी अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांनी केले आहे. या वक्तव्याची क्लिप दहिसर पोलिस ठाण्यात देत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने सुर्वे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पडले. यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे राज्यात सरकार आले. यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी शिवसेनेतील नेत्यावर जोरदार टीकास्त्र डागायला सुरूवात केली आहे. यात एकनाथ शिंदेंपासून तर प्रत्येक आमदार ठाकरेंना आणि शिवसेनेतील उर्वरित नेत्यांवर तोंड सुख घेत आहे. यामुळे राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद पहायला मिळतो आहे. यामुळे आता राज्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैली झाडताना एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला आहे.