अल्पवयीन मुलाच्या हातात स्टेरिंग द्याल तर….

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुले गाडी चालवताना झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले आहे. या ठिकाणी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला देणं त्याच्या वडिलांना चांगलंच अंगलट आले आहे.

पुणे-बेंगलोर महामार्गलगत 22 डिसेंबरला झालेला हा थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी तानाजी शिंदे तर सर्व्हिसिंग सेंटरवरील आकाश बोडके या दोघांना अटक केली आहे.

तानाजी शिंदेंनी यांनी त्यांची गाडी मंगळवारी सर्व्हीसिंगला दिली होती. ते कामात व्यस्त असल्याने त्यांनी अल्पवयीन मुलाला गाडी घरी घेऊन यायला सांगितली. त्या मुलाने त्याच्या इतर तीन मित्रांना सोबत घेतलं आणि ते सर्व्हिसिंग सेंटरवर गेले. तिथं आकाश बोडके नामक व्यक्तीने शिंदेंचा मुलगा अल्पवयीन असताना त्याच्या हातात गाडीची चावी दिली. मग ते घराच्या दिशेने निघाले तेव्हा अल्पवयीन मुलगा सुसाट वेगाने गाडी चालवत होता.

पुणे-बेंगलोर महामार्गलगत पुनावळे परिसरात ते आले तेव्हा नियंत्रण सुटल्याने गाडी पलटली आणि थेट फर्निचर आणि ग्लास डेकोरच्या दुकानांना ठोकर दिली होती. हिंजवडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाल्याने या थरारक अपघाताची तीव्रता लक्षात आली. त्यामुळे पोलिसांनी चौघांना ही ताब्यात घेतलं, अधिकची चौकशी केली असता तो अल्पवयीन असून अकरावीचं शिक्षण घेत असल्याचं समोर आलं.

याप्रकरणी अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल करून, त्याच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. अल्पवयीन मुलगा आणि वडिलांच्या जबाबात सविस्तर घटनाक्रम समोर आला. वडिलांनीच सर्व्हिसिंग सेंटर वरून गाडी आणायला सांगितल्याचे आणि चालक अल्पवयीन असल्याचे माहीत असताना आकाश बोडकेने हातात चावी दिल्याचं तपासात निष्पन्न झाले. त्यामुळं पोलिसांनी त्यांना अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.