विनाकारण बाहेर फिरल्यास थेट गाडीच होणार जप्त

0

पुणे : करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. मात्र असं असलं तरीही रस्त्यावरील गर्दी अद्यापही कायम आहे. हीच गर्दी कमी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोलिस आणखी कठोर कारवाई करणार आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विनाकारण वाहनांवरून फिरणाऱ्यांविरूद्ध आता ५०० रुपये दंडाबरोबरच वाहन जप्तीची कारवाई होणार आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पोलिसांना याबाबतचे अधिकार दिले असून, जप्त केलेली वाहने ही लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत परत दिली जाणार नाहीत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक नागरिक हे विनाकारण वाहनांमधून फिरत असल्याचे आढळून येत आहे. पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या नाकाबंदीमध्ये ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय वाहनांवरून फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. ५०० रुपये दंड आकारण्याबरोबरच संबंधितांची वाहने ही जप्त करण्यात येणार आहेत.

जप्त केलेली वाहने ही लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत परत देऊ नयेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र असं असलं तरीही अद्याप करोनाचं संकट दूर झालेलं नाही. ग्रामीण भागात अजूनही रुग्णवाढ सुरू आहे. तसंच आरोग्य व्यवस्थेची स्थितीही अद्याप पूर्णपणे प्रबळ झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनाही जबाबदारीने वागत प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.