पुणे : शिवसेनेने भाजपचा विश्वासघात केला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ज्या पक्षावर दोन पिढ्यांपासून टीका करत होते त्यांच्या मांडीवर बसलात. सत्तेसाठी हिंदुत्व बाजूला ठेवलंत असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर टीकेची तोफ डागलीच आहे. मात्र याबरोबरच उद्धव ठाकरेंना खुलं आव्हानही दिलं आहे.
महाराष्ट्रात सरकार आहे का कुठे? शिवसेनेने आमच्यासोबत विश्वासघात केला आणि सत्ता मिळवली. चला झालात आता मुख्यमंत्री आमच्याशी दगा करून. ‘मी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात आलो होतो. त्यावेळी शिवसेनेबाबत जो संवाद झाला तो मी केला आहे. मी आज पु्न्हा एकदा हे सांगू इच्छितो त्यावेळी हे ठरलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल आणि मुख्यमंत्री भाजपचा होईल. मात्र शिवसेनेने शब्द फिरवला. सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होतात, सत्तेसाठी त्यांच्या मांडीवर शिवसेना बसली.’
‘त्यानंतर आम्हाला खोटं ठरवलं. उद्धव ठाकरे म्हणतात की मी खोटं बोलतोय, चला आपण एक सेकंदासाठी मानू. पण उद्धवभाऊ तुमच्या सभेच्या मागे जे बॅनर होते ते तुम्ही कधी पाहिले का? मोदींचा फोटो केवढा होता आणि तुमचा केवढा होता पाहिला का? तुम्हाला तुमच्या प्रत्येक भाषणात मोदींचं नाव घ्यावं लागत होतं. तुम्हाला मी आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. मात्र त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून विश्वासघात केला. सत्तेवर बसून काय केलं? मी काही दिवसांपूर्वी आलो होतो तेव्हा म्हटलं होतं महाविकास आघाडी सरकार रिक्षासारखं आहे. तीन पक्ष म्हणजे तीन चाकं आहेत त्यांच्या दिशा तीन दिशेला जातात. मात्र मी थोडं चुकलो होतो तेव्हा ती चूक आज सुधारतो. महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकांची पंक्चर रिक्षा आहे. त्याची चाकं पुढे जातच नाहीत फक्त धूर निघतो.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं लोकमान्य टिळक म्हणत असत. शिवसेना म्हणते सत्ता मिळवणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, कोणत्याही मार्गाने आम्ही ती मिळवणार. मी आता तुम्हाला आव्हान देतोय हिंमत असेल तर द्या राजीनामा. निवडणूक घ्या पुन्हा, तिन्ही पक्षांना एकट्याने सामोरं जायला भाजपचा कार्यकर्ता तयार आहे. महाराष्ट्राची जनताही तुमचा हिशोब करायला बसली आहे. असं आव्हान अमित शाह यांनी दिलं आहे.