मुंबई : राज्यातील राजकीय विशेषतः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलेल्या गटा विषयी शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद साधला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह केला. म्हणून मी मुख्यमंत्री झालो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना मी मुख्यमंत्री होणे अपेक्षित आहे. मात्र माझ्याच पक्षाच्या शिवसेनेच्या लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको झालो आहे. त्यामुळे माझ्या पक्षाच्या आमदारांनी समोर येऊन सांगावे. मी माझे मुख्यमंत्री पद सोडायला तयार असल्याची भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांना घातली आहे.
राज्यात राजकिय घडामोडी बदलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मला लाभले. जनतेची सेवा केली. कोरोनामुळे लोकांना भेटता आले नाही. आता सगळ्यांना भेटत आहे. इतर सहकाऱ्यांनी आग्रह केला म्हणून मी मुख्यमंत्री झालो. प्रशासन माहिती नसताना प्रामाणिक काम केले. मात्र काही जण नाराज असल्याचे समजते.
बाळासाहेबांची सेना संपली असे वातावरण केले. मात्र बाळासाहेबांनंतरच अनेकांना मी पदे दिली हे विसरू नये. मात्र गुजरातला जाऊन नाराज असल्याचे आता आमदारांनी सांगायची गरज नाही. समोर येऊन सांगा मी राजीनामा तयार ठेवला असल्याचे ठाकरे म्हणाले. एकही मत विरोधात जाणे हे माझ्यासाठी त्रासदायक आहे. त्यामुळे ज्याला मी नको आहे त्यांनी मला सांगावे. मी पद सोडतो अशी भावनिक साद ठाकरे यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांना घातली.