नशेसाठी औषधाची अवैध विक्री; एकास अटक

0

पुणे : नशेबरोबरच बॉडी बिल्डिंगसाठी अवैध पद्धतीने ह्दयाच्या औषधाची (‘मेफेंटरमाईन’) विक्री करणार्‍याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शंकरशेठ रोड परिसरातून सापळा रचून अटक केली.

अमृत पंडित चौधरी (वय 30, रा. केशवनगर, मुंढवा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या मेफेंटरमाईन सल्फेट या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी शामल महिन्द्रकर यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी हा एक हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री करत होता, असे तपासात समोर आले आहे. मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधीत औषधे (इंजेक्शनचा) नशेसाठी विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच दैनिक ‘पुढारी’ने देखील काही दिवसांपूर्वी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्या वेळी पोलिस हवालदार नामदेव रेणुसे यांना एक व्यक्ती शंकरशेठ रोडवर मेफेंटरमाईन या औषधाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सापळा रचून चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कोणत्याही प्रकारची औषधे खरेदी करून विक्री करण्याची परवानगी त्याच्याकडे नसल्याचे दिसून आले. तरुणांना नशा आणि बॉडी बिल्डिंगसाठी तो ही औषधे बेकायदा विक्री करत असल्याचे समोर आले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते, कर्मचारी शंकर नेवसे, उज्ज्वल मोकाशी, विजय पवार, साधना ताम्हाणे, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

रुग्णाचे ह्रदयाचे कमी झालेले ठोके वाढण्यासाठी आणि कमी झालेला रक्तदाब वाढण्यासाठी ‘मेफेंटरमाईन’ हे औषध रुग्णाला देण्यात येते. मात्र, हेच औषध आता मुले व तरूणांकडून नशा करण्यासाठी वापरले जात असल्याचे पुन्हा एकदा पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर आले आहे. काही व्यक्ती या औषधाची राजरोस विक्री करीत आहेत. प्रामुख्याने तरुणवर्गात हे औषध नशेसाठी वापरले जाते आहे. एकदा का या औषधाची सवय लागली की तरुण त्याच्या आहारी जातो.

अवैध औषधविक्रीचे मोठे रॅकेटच शहरात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन’ असे या औषधाचे नाव आहे. ते रुग्णाला इंजेक्शनद्वारे दिले जाते. पण, त्याचा उपयोग 12 ते 30 वयोगटातील मुले व तरुणांकडून नशा करण्यासाठी मोठया प्रमाणात केला जात आहे. हे इंजेक्शन दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला ताजेतवाने आणि उत्साही वाटते. तसेच, झोपही येत नाही, म्हणून हे औषध मोठया प्रमाणात वापरले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.