मुंबई : निवडणूक चिन्हासंदर्भातली शिंदे आणि ठाकरे गटाची सुनावणी आता 12 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 9 डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
दोन्ही गटांचे पहिल्यांदाच समोरासमोर युक्तिवाद करण्यात येणार आहे. 12 डिसेंबरची तारीख ठाकरे आणि शिंदे गटासाठी खूप महत्वाची मानली जात आहे.
8 ऑक्टोंबरला निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं गोठवलं होतं. त्यानंतर आता या संदर्भातला अंतिम निर्णय बाकी आहे. 23 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची लिखित कागदपत्रे मागवून घेतली होती. त्यामध्येही निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. आता 9 डिसेंबर पर्यंत लिखित कागदपत्रे सादर करण्यात येणार आहेत.
तुलनेने खूप वेगवान हालचाली होताना दिसत आहेत. या आधीच्या सर्व प्रकरणांमध्ये किमान एक वर्ष लागलं होतं. परंतु या प्रकरणामध्ये कागदपत्रे आणि सुनावणी प्रक्रिया यांना वेग आला आहे. राज्यांमध्ये निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे तातडीने ही सुनावणी घेण्यात येत असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपसोबत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के बसले. खरी शिवसेना कोणाची या वादानंतर आणि अंधेरी पूर्व निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं गोठवलं आणि ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला वेगळी नावे आणि चिन्हे देण्यात आली परंतु हा वाद सुरूच आहे. दरम्यान या सुनावणीमुळे खरी शिवसेना कोणाची यावर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे.