पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यात खुलेआम सुरु असलेल्या ‘हुक्का पार्लर’वर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकला. दोघांना अटक करुन 15 प्रकारचे प्लेवर, हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई काल रात्री करण्यात आली आहे.
हद्दीत अवैध धंदे पूर्णपणे बंद पाहिजेत, असा आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहेत. सामाजिक सुरक्षा पथकाला सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळकरनगर येथिल इग्नाइट रेस्टो अँन्ड लॉंच या ठिकाणी हुक्का सुरू असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे हुक्का विक्री सुरु असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या ठिकाणाहून हुक्क्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले असून प्रसन्न शिवानंद परेसुद (27, रा. पिंपळे गुरव) आणि व्यंकटमनिया या दोघांना अटक केली आहे.