पुणे : घोड्याच्या शर्यतीवर बेटिंग घेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला असून वानवडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आतम अशोक बजाज (४५, रा. लुल्लानगर) आणि फिरोज रशिद पठाण (३२ रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार निळकंठ राठोड यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १४४/२२) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यदनगर येथे घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेतले जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी अगोदर खात्री केली. त्यानंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सय्यदनगर येथील घरावर छापा घातला. यावेळी तेथे बजाज व पठाण हे घोड्याच्या शर्यतीवर मोबाईलद्वारे ऑनलाइृन सट्टा लावत असल्याचे आढळून आले.
त्यांच्याकडून मोबाईल व जुगारीचे साहित्य असा १७ हजार ४३९ रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.