पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच बाहेरच्या वस्तीत रात्री उशिपापर्यंत सुरु असलेल्या चार हॉटेल्सवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. ‘वॉटर बार’, ‘द हाउज अफेअर’ ‘रुफटॉप व्हिलेज’, ‘अजांत जॅक्स’ या हॉटेल्सवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 अ नुसार गुन्हा दाखल करुन ‘द हाउज अफेअर’ मधील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच बाहेरील वस्तीत रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल्समधील हुक्का पार्ट्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सामाजिक सुरक्षा विभागाला दिले होते. त्यानुसार मागील चार आठवड्यापासून उशिरापर्यंत व विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु असलेल्या हॉटेल्स, बार यांना सुरुवातीला वेळेत बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र त्यानंतरही सूचनांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्सवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या विशेष अभियानांतर्गत गेल्या चार आठवड्यापासून सामाजिक सुरक्षा विभागामार्फत शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, बारवर तसेच हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागास, नुकतेच पुणे पोलीस दलात हजर झालेले नऊ परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ विरोधी सेलचा स्टाफही देण्यात आला होता. या संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोहीमेअंतर्गत शनिवारी रात्री व रविवारी पहाटेच्या दरम्यान पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील ‘वॉटर बार’, येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ‘द हाउज अफेअर’ आणि कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील ‘रुफटॉप व्हिलेज’, व ‘अजांत जॅक्स’ अशा विविध हॉटेल्स बार वर छापा टाकून, मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याबद्दल, त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहीम राबवित असता कल्याणीनगर येथील ‘द हाउज अफेअर’, मुळीक कॅपीटल बिल्डिंग, कल्याणी नगर या बार मध्ये पहाटे 2.55 च्या सुमारास अवैधरित्या हुक्का बार चालू असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पंचासमक्ष छापा कारवाई करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळावर 6 हुक्कापॉट्स, चिलीम व वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ,
3 मोबाईल, 1 डिव्हिआर व इतर साहित्य असे एकुण 89,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
‘द हाउज अफेअर’ रेस्टॉरंट व बारचा मॅनेजर सौरभ दत्तात्रय नवगण (35, रा. 403, बी – 2, सिल्वर ओक सोसायटी, कल्याणी नगर, येरवडा, पुणे), प्रसन्न उत्तम पाठक (24 रा. 15 बी, आशा, श्री राधा विलास सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे),
सुपरवायझर श्रवण भुटन मंडल (34, रा. अमन अनुप हॉटेल जवळ, वडगाव शेरी, पुणे अशा तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे आयपीसी 4 (अ), 21 (अ) सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम – 2018 चे अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.
आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, नऊ परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक तसेच सामाजिक सुरक्षा विभाग व अंमली पदार्थ विरोधी पथक – 2 यांचे कडील पोलीस अंमलदार यांनी संयुक्तपणे केली आहे.