मुंबई ः दिल्लीच्या सीमेवर मागील ४० दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लक्षात खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. आपला कर्मचारी आजारी आहे म्हणून ८३ वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्याला जातात आणि दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जात नाही, बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला, दुसरे काय?, अशा कडक शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
“आपला एक माजी कर्मचारी आजारी आहे हे समजताच रतन टाटा हे मुंबईतून प्रवास करीत पुण्यात गेले. त्या कर्मचाऱ्याला त्याच्या छोट्या घरात जाऊन भेटले. त्याच्या कुटुंबास धीर दिला. प्रत्येक पिढीतले ‘टाटा’ हे भारतरत्न का झाले आणि अंबानी-अदानी यांना ‘टाटां’ची प्रतिष्ठा का मिळू शकली नाही त्याचे उत्तर टाटांच्या या जीवनशैलीत आहे. हे टाटादेखील सध्या मोदी नितीचे समर्थक आहेत”, असेही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे.
संजय राऊत आपल्या सदरात पुढे म्हणतात की, “सध्या आपल्या देशात काय सुरु आहे हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोना संसर्गाच्या दहशतीमुळं वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते देशातच आहेत. पण भारतातील जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? शिवाय, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे करोनाचा नवा स्ट्रेन घेऊन २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अवतरणार होते, पण इंग्रज हे जात्याच शहाणे असल्याने त्यांनी दिल्लीत येण्यास नकार दिला”, असे राऊत यांनी टोला लगावला आहे.