मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

0

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या उत्तरोत्तर मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंधांप्रमाणे ही तिसऱ्या लाटेकडील आणि परिणामी लॉकडाऊनकडील कूच नसेल ना ? अशी भीती आता सर्वसामान्यांना भेडसावू  लागली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केवळ लॉकडाऊनचे संकेत दिले, तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी रुग्णसंख्या ५० हजार ते १ लाखांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली आहे.  

मुंबईत मंगळवारी  १,३७७ रुग्ण आढळले होते, तर बुधवारी जवळपास त्याच्या दुप्पट म्हणजे २,५१० रुग्ण आढळले. तर गुरुवारी हीच संख्या ३,६७१ झाली. म्हणजे बुधवारपेक्षा गुरुवारी १ हजाराने रुग्णवाढ झाली. डिसेंबरच्या सुरुवातीला शंभरापर्यंत आलेली रुग्णसंख्या महिनाअखेरीस चार हजारांकडे  जात असेल तर ती ४० पट वाढली आहे. म्हणजे रुग्णसंख्या वाढीचा वेग किती असेल हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्या २,८४८ पर्यंत पोहोचली होती. दुसऱ्या लाटेत तीच रुग्णसंख्या ११ हजारांवर पोहोचली होती आणि आता तिसऱ्या लाटेत कमीतकमी ५० हजारांपर्यंत आणि जास्तीत जास्त १ लाखापर्यंत रुग्णसंख्या पोहोचण्याचे संकेत देण्यात आले आहेत.   

कोरोना रुग्णवाढ ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, तर राज्यात अधिक कडक निर्बंध लागू शकतात, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. गृहमंत्र्यांनी तर लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. आणि पालकमंत्र्यांनी चक्क रुग्णवाढ किती होऊ शकते हे आकडे सांगणारे विधान केले आहे.  त्यामुळे प्रत्येत दिवस धोक्याचा समजून सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. 

 मुंबईत रविवारी ९२२ रुग्ण आढळले होते, तर सोमवारी त्यात घट होत ८०९ रुग्ण आढळले होते. पण मंगळवारी १,३७७ रुग्ण,  बुधवारी २,५१० रुग्ण आणि गुरुवारी ३,६७१ रुग्ण सापडले. त्यामुळे गुरुवारची एकूण रुग्णसंख्या ७,७९,४७९ झाली. आज ३७१ रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ७,४९,१५९  झाली. एकीकडे मोठ्या संख्येने रुग्णवाढ झाली असली तरी आज एकही मृत्यू झालेला नाही. मृतांची एकूण संख्या १६,३७५ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.