राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच

0

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपचे कोल्हापूरचे धनंजय महाडिक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात सध्या अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महाडिक यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्यांबरोबरच अख्खं महाडिक कुटुंबीय प्रचारात सक्रीय झाले आहे. ते अपक्षांसह २५ जिल्ह्यांतील आमदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

महाडिकांनी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, कारखान्याचे संचालक यांना कामाला लावले आहे.

राज्यातील अपक्षांसह २५ जिल्ह्यातील आमदारांना भेटण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबतचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी सुमारे पंचवीस पथके तयार करण्यात आली. खुद्द धनंजय महाडिक यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांनी दहा अपक्ष व अन्य पक्षाच्या आमदारांच्याही गाठीभेटी घेतल्या आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, बहुजन विकास आघाडी पार्टीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, अपक्ष श्रीमती गीता जैन, जनसुराज्यचे विनय कोरे, अपक्ष प्रकाश आवाडे यांचा त्यामध्ये समावेश आहे. मनसेचे प्रमोद ऊर्फ राजू पाटील, समाजवादी पार्टीचे आबू आझमी व रईस शेख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व अपक्ष महेश बालदी यांचीही धनंजय महाडिक भेट घेणार आहेत.

गोंदियाचे अपक्ष विनोद अग्रवाल व चंद्रपूरचे अपक्ष किशोर जोरगेवार यांची माजी आमदार अमल महाडिक यांनी भेटी घेतली. अमरावती जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडून आलेल व सध्या राष्ट्रवादीच्या जवळ असणारे देवेंद्र भुयार व प्रहार जनशक्तीचे राज्यमंत्री बच्चू कडू, राजकुमार पटेल आणि अपक्ष रवी राणा यांची पृथ्वीराज महाडिक व राजन महाडिक यांनी भेट घेत पाठिंब्याचे आवाहन केले आहे. नागपूरमधील अपक्ष आमदार आशिष जैस्वाल आणि भंडाऱ्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनाही मतदानासाठी महाडिकांनी गळ घातली आहे.

दुसरीकडे, गंगाखेडचे (जि. परभणी) राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, शेतकरी कामगार पक्षाचे लोहा (जि. नांदेड) मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांची राहुल महाडिक आणि ओमवीर महाडिक यांनी भेट घेऊन राज्यसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, धुळे शहरातील एमआयएमचे आमदार फारुख शहा व मालेगावमध्ये मोहम्मद मुफ्ती, जळगाव मुक्ताईनगरचे अपक्ष चंद्रकांत पाटील यांची सम्राट महाडिक यांनी भेट घेतली.

प्रा. जयंत पाटील आणि स्वरूप महाडिक यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे अपक्ष संजय शिंदे व बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या भेटी घेतल्या. जनुसराज्य शक्ती पक्षाचे आमदार, डॉ. विनय कोरे यांची माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेऊन राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे. भेटीवेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रा. जयंत पाटील, महापालिकेचे नगरसेवक मुरलीधर जाधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.