नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर जम्मू काश्मिरात गुरूवारी एक मोठा अतिरेकी हल्ला झाला आहे. खोऱ्यातील राजौरीपासून 25 किमी अंतरावरील एक लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात लष्कराचे 3 जवान शहीद झालेत. तर 2 अतिरेकीही यमसदनी पोहोचलेत. ठार झालेले दोन्ही अतिरेकी आत्मघातकी हल्लेखोर होते. ते परगल स्थित लष्करी तळावर उरीसारखा भयंकर हल्ला करण्याच्या प्रयत्नांत होते. पण तत्पूर्वीच जवानांनी त्यांना कंठस्नान घातले.
माध्यमांच्या वृत्तानुसार, हा हल्ला बुधवारी रात्री उशिरा दारहालच्या परगलमध्ये झाला. अतिरेक्यांनी लष्करी तळावर शिरण्याचा प्रयत्न केला असता जवानांनी त्यांना रोखले. यावेळी झालेल्या अंदाधूंद गोळीबारात 3 जवान शहीद झाले. हल्ल्यात 2 आत्मघातकही हल्लेखोरही ठार झाले. त्यानंतर त्यांचे उर्वरित सहकारी पळून गेले. या हल्ल्यानंतर जवानांनी जवळपास 6 किमी परिसराला घेराव घालून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.
जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, राजौरीतील परगल, दारहाल भागातील लष्करी छावणीचे कुंपण अतिरेक्यांनी ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जवानांनी त्यांना चुचकारले असता त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी भयंकर गोळीबार झाला. दारहाल पोलिस ठाण्यापासून 6 किमी अंतरापर्यंत अतिरिक्त सुरक्षा जवान तैनात करण्यात आलेत. या घटनेत 2 जवानही जखमी झालेत.