मौलनावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता
हिंदू देव-देवतांचे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो प्रसारित केल्याचे प्रकरण
पुणे : हिंदू देव-देवतांचे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो प्रसारित केल्याने उंड्री येथील मशिदीमधील मौलनावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
दादा ऊर्फ अमित वाल्मीकी हरपळे (२१, रा. फुरसुंगी), दीपक वसंत गोरगले (२३, रा. उंड्री ), दत्तात्रेय राजेश टाक (२५, रा. पिसोळी) आणि श्रीकांत नागेश माळगे (२९, रा. उंड्री) पुणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर आरोपी अतुल रवींद्र कड (२७ रा. उंड्री) याचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाल्याने त्यांना खटल्यातून वगळले होते. ही घटना एक जून २०१४ रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.
आयेशा मशीद उंड्री येथून मौलाना म्हणून नमाज पठणाचे काम करून मौलाना अशपाकअहमद अन्सारी (४०, रा. आयेशा मशीद उंड्री) हे त्यांच्या भावाबरोबर वानवडी बाजार येथे जाण्यासाठी बिशप स्कूल समोरील रोडवर रिक्षाची वाट पहात थांबले होते. त्यावेळी आरोपी आरडाओरडा करीत तेथे आले व अशपाक व त्यांच्या भावाला दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अशपाक हे जागेवरच बेशुद्ध पडले होती.
हिंदू-देवदेवतांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियाावर प्रसिद्ध झाल्यामुळे या आरोपींनी मला मारहाण केली आहे, अशी फिर्याद मौलाना यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात दिली होती. आरोपींच्या वतीने अॅड मिलिंद पवार यांनी खटल्याचे काम पाहिले. फिर्यादी हे मुळचे पश्चिम बंगालचे आहेत. त्यामुळे त्यांना वैयक्तिक कोणालाही ओळखत नाही. त्यामुळे नेमकं कोणी हल्ला केला व का केला हे सांगू शकत नाही, असे अशपाक यांनी अॅड पवार यांनी घेतलेल्या उलटतपासणीत न्यायालयात मान्य केले होते.
संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता :
सरकार पक्षाची वतीने एकही साक्षीदार न्यायालयात आणण्यात आला नाही. कोंढवा पुणे येथील मुस्लिम समाजातील स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून फिर्यादी अशपाक यांनी आरोपींचे नाव घेऊन या खटल्यात गुंतविले असल्याचा युक्तिवाद अॅड. पवार यांनी केला. तो ग्राह्य धरून चारही आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली. खटल्यात अॅड. पवार यांना अॅड. सचिन हिंगणेकर, अॅड. अजय ताकवणे व अॅड. विश्वास खराबे यांनी मदत केली.