युपीए अध्यक्षपदाऐवजी पवारांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करायला हवा होता, भाजपची कोपरखळी !

0

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद घ्यावे असा प्रस्ताव संमत करण्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती, अशी कोपरखळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर मारली आहे.

काल दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीला शरद पवार यांचीही उपस्थित होती. दरम्यान, काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते, असे या ठरावात म्हटले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हे वृत्त प्रसिद्ध होताच यावरूनच भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून यावर भाष्य करत टोलेबाजी केली आहे.

याबाबत केलेल्या आपल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे कि, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्याऐवजी त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर देशाच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी मिळाली असती. उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला, असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान  शरद पवार यांनाच यूपीएचे अध्यक्ष करावे, अशी मागणी पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. नुकतीच त्यांची आणि वरूण गांधी यांची भेट झाली होती. या भेटी विषयी काल त्यांनी मौन बाळगले असले तरी आज त्यांनी माध्यमांशी बोलत असताना , पवार यांच्या युपीएच्या अध्यक्षपदाबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

वरुण गांधी यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले कि , ही एक सदिच्छा भेट होती. आम्ही अनेक विषयावर चर्चा केली, ते चांगले लेखक आहेत, राजकीय विषय चर्चेत निघत असतात. वरूण गांधी आणि त्यांच्या परिवाराचे ठाकरे परिवाराशी घनिष्ठ संबंध आहेत. शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे , या भूमिकेचे आम्ही नेहमीच स्वागत केले आहे. विरोधी पक्षाची एकजूट जर आपल्याला करायची असेल, बिगर भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री यांना एकत्र आणायचे असेल तर हे काम शरद पवार या नक्कीच करू शकतात. संजय राऊत यांनी याआधीही शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची मागणी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.