अहमदनगर ः शिर्डीत साईबाबांच्या दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना आता पारंपरिक म्हणजेच भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. कारण, शिर्डी संस्थानाने अशी सूचना सर्व भक्तांना केलेली आहे. तशा आशयाचे फलक मंदीर परिसरात लावण्यात आले आहेत.
संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या नेतृत्वातून हा निर्णय घेण्यात आला आहे आणि अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. इतर मंदिरांप्रमाणे शिर्डी देवस्थानाने कपड्यासंबंधीसाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी भक्तांकडून होत होती. त्यांच्या विनंतीचा विचार करुन संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.
शिर्डी देवस्थान परिसरात लावलेल्या फलकांवर, ”साई भक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधाव करावी”, असे लिहिण्यात आलेले आहे. हे फलक हिंदी, मराठी आणि इंग्रजी अक्षरांमध्ये लिहिलेले आहे.