मुंबई : NCB आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग नेटवर्क चालविणारा ड्रग तस्कराला नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने नवी मुंबईत कारवाई करुन अटक केली आहे. स्टीफन सॅम्युअल टोनी असे या ड्रग तस्कराचे नाव आहे. त्या ताब्यातून १०२ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई करीत असताना टोनी याने NCB च्या अधिकार्यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर नवी मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
स्टीफन सॅम्युअल टोनी हा कोकेनचा पॅन इंडियात पुरवठा करत होता. कोलंबियाहून इथिओपिया मार्गे तो मुंबईत कोकेनच्या नेटवर्कमार्फत पुरवठा करण्यात महत्वाचा दुवा आहे. अलिकडेच तो कोकेनच्या पुरवठ्यासाठी दिल्लीहून मुंबईला आला होता. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबी मुंबईचे अधिकारी त्याच्यावर पाळत ठेवून होते. त्याच्याकडे कोकेन असल्याची माहिती मिळाल्यावर नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर ३० येथे शुक्रवारी पहाटे कारवाई करुन स्टीफन टोनी याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करुन अधिकार्यांवर हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाल्यानंतरही पोलिसांनी त्याला जेरबंद करीत त्याच्याकडून १०२ ग्रॅम कोकेन जप्त केले.
शासकीय कर्तव्यात सरकारी अधिकार्यांना अडथळा आणल्याप्रकरणी स्टीफन सॅम्युअल टोनीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येत आहे. एनसीबी मुंबईने अंमली पदार्थाच्या तस्करांविरोधात सातत्याने कारवाई केली असून २०२१ मध्ये आतापर्यंत २२ परदेशी नागरिकांना अटक केली आहे.