पिंपरी : होलसेल दुकानातून वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करुन, विश्वास संपादन करुन, त्यानंतर लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. टोळीकडून सोळा लाखांचा माल जप्त केला आहे.
दीपक मुरलीधर पनपालीया (५१, रा. मगोब, सुरत), अशोककुमार नैनचंद बाफना उर्फ अंकित जैन (रा.सारोली, सुरत, गुजरात), ललितकुमार तुलशीराम खंडेलवाल (३७, रा. सिरोही, राजस्थान), झाकीर नुरमोहम्मद हुसैन उर्फ राजेश पुरी (४८, रा. सैंदवा, जी. बडवानी, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
व्हिक्टर जॉन पीटर (रा. दापोडी ) यांचे ताथवडे येथे प्राईम सेल्स कॉर्पोरेशन नावाचे दुकान असून ते स्लिपशुअर कंपनीचे वितरक आहेत. ते बेडशीट व इतर वस्तू विकत असतात. होलसेल व्यवहारात एक महिन्याची मुदत असते. दरम्यान, पीटर यांच्या दुकानात फत्ते ट्रेडिंगचे मालक राजेश योगेंद्रपाल पुरी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने व ए.डी. ट्रेडिंग कंपनीचे मालक अंकित जैन असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने वेळोवेळी पीटर यांच्या दुकानातून माल विकत घेतला.
सुरुवातीला काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपी अकरा लाख ५९ हजारांचा माल उधार घेऊन पसार झाले. तसेच राजाराम नाथाजी भाटी हे रिपोज कंपनीचे वितरक असून त्यांचीही आरोपींनी आठ लाख रुपयांचा माल उधार घेऊन फसवुक केली. याप्रकरणी वाकड पॉलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, या आरोपींनी गुन्हा करण्यासाठी बनावट नाव वापरल्याचे तपासात समोर आले. दीपक व अशॊककुमार यांना गुजरात येथून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्यांनी झाकीर हुसैन उर्फ राजेश योगेन्द्रपालउर्फ राजेश पुरी याच्या साथीने गुन्हा केल्याचे समोर आले.
झाकीर याने ठरल्याप्रमाणे खर्चास पैसे न दिल्याने दीपक व अशोककुमार यांनी ललितकुमार यास खर्च करण्यासाठी कटात सामील करून घेतले. होणाऱ्या नफ्यात त्याला पन्नास टक्केच भागीदार बनविले. यानंतर अपहार केलेला माल ललितकुमार यांच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला राजस्थान येथून ताब्यात घेत सात लाख ४६ हजारांचा माल जप्त केला.
झाकीर याला मध्यप्रदेश येथून ताब्यात घेत त्याच्याकडून आठ लाख ७२ हजारांचा माल जप्त केला. अपहार झालेल्या मालापैकी एकूण १६ लाख १८ हजार ५०७ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. वाकड पोलिस अधिक तपास सुरु आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, संतोष पाटील (गुन्हे), तपासी पथकचे सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.