नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विराेधात हजाराे शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना ३ डिसेंबरला भेटीसाठी बाेलाविण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी दिली आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांनी दिल्लीला घेरण्याची तयारी केली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये किसान विरुद्ध जवान असा अभूतपूर्व संघर्ष दिसला हाेता. त्यानंतर शेतकऱ्यांना बुराडी येथील निरंकारी मैदानात शांततेच्या मार्गाने आंदाेलन करण्याची परवानगी देण्यात आली. या संघर्षावरुन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी माेदी सरकारवर निशाणा साधला. जय जवान, जय किसान असा आमचा नारा हाेता. परंतु, आज जवान शेतकऱ्यावर शस्त्र राेखून उभा दिसत आहे, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले.
निरंकारी मैदानात जाण्याची परवानगी दिल्यानंतरही शेकडाे शेतकरी दिल्लीच्या वेशीवरच ठाण मांडून बसले आहेत. निरंकारी मैदानात पाेहाेचलेले शेतकरी तिथेच राहून आंदाेलन करणार आहेत. तर दिल्लीच्या वेशीवर आलेले शेतकरी शहराला घेराव टाकण्याच्या पावित्र्यात आहेत. शहराची चाेहीकडून काेंडी झाल्यास मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव येऊ शकताे.
Prev Post