मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूर संस्थानाचे आमंत्रण

0

ठाणे : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्यांनी आज (दि. ५ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले.

यावेळी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूरचे प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, सदस्य शिवाजी महाराज मोरे, माधवी निगडे तसेच मंदिर समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच देवस्थान सदस्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून महापूजेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र राज्यात नुकत्याच झालेल्या वेगवान राजकीय हालचालींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले आहेत. त्यामुळे देवस्थानतर्फे त्यांना निमंत्रण देण्यात आले.

गेल्या आठवड्यात वेगवान राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून कोण महापूजेला येणार, याची वारकऱ्यांना उत्सुकता होती. मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी वारकरी आपणास महापूजेला येण्याबाबत विचारणा करत असल्याचा उल्लेख केला होता. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा सपत्निक महापूजेला येतील, अशी अटकळ बांधली जात होती. तर राष्ट्रपती राजवट लागल्यास राज्यपाल महापूजेला येतील असे अंदाज वर्तविले जात होते. राजकीय घडामोडींमध्ये शिंदे यांनी बाजी मारल्याने यंदा मुख्यमंत्री म्हणून त्यांना महापूजेचा मान मिळत आहे.

उभ्या मऱ्हाटी मुलुखाचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलाची आषाढी एकादशीची महापूजेची परंपरा ब्रिटिश कालावधीपासून सुरू आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी ही महापूजा करत असत. त्यासाठी ब्रिटिशांकडून दोन हजार रुपयांचे वार्षिक अनुदानही दिले जात असे. त्याहीपूर्वी १८४० च्या दरम्यान विठ्ठलपुजेचा मान सातारा गादीकडे असल्याचे संदर्भ आहेत. पेशवाईत थोरले बाजीराव पेशवे यांनी विठ्ठलाची देवस्थान समिती नियुक्त स्थापन केली, या समितीमार्फत पूजा केली जात असे, असेही सांगितले जाते.

पुढे संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आल्यानंतर या प्रथेत थोडा बदल झाला. ही पूजा महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या हस्ते होऊ लागली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आल्यानंतर महसूलमंत्री राजारामबापू पाटील यांनी आषाढी एकादशीची पहिली महापूजा केली. १९६३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी मुख्यमंत्री असताना, तर १९७७ मध्ये वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना ही महापूजा केली.

पुढे या पूजेवरूनही मानपान होऊ लागले. १९९५ मध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही महापूजा शासकीय पूजा म्हणून जाहीर केली. त्यानंतर ही महापूजा फक्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.