भोसरीतील एटीएम चोरी प्रकरणात बँकेचा कॅशियर, शिपाई यांचा सहभाग
काही तासातच पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद
भोसरी : येथील सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम बनावट चावीच्या साहाय्याने उघडून रक्कम चोरून नेणाऱ्या टोळीला पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) मध्यरात्री दीड वाजता घडली. या प्रकरणात बँकेचा कॅशियरच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कॅशियर, बँकेचा शिपाई आणि अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
कॅशियर सचिन शिवाजी सुर्वे, रोहित महादेव गुंजाळ (रा. पिंपरी), आनंद चंद्रकांत मोरे (रा. पिंपरी), रोहित काटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भोसरी मधील पुणे-नाशिक रोडवर शिवगंगा कॉम्प्लेक्स मध्ये सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम आहे. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास दोन चोरट्यांनी एटीएम उघडून त्यातून 4 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही चोरी करत असताना गोपीनाथ पिंडारे या व्यक्तीने आरोपींना हटकले. त्यावेळी आरोपींनी त्यांना लोखंडी हातोडा उगारून मारण्याची भीती घातली आणि चोरटे पळून गेले.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सुरुवातीला एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एटीएम सेंटरच्या आतील सीसीटीव्ही आणि एटीएमची स्क्रीन चोरट्यांनी फोडली होती. मात्र सेंटरच्या बाहेरील कॅमेऱ्यात एक चोरटा कैद झाला होता. एटीएम फोडण्याच्या पद्धतीवरून यात बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. बँकेचा शिपाई रोहित गुंजाळ या कर्मचाऱ्यावर पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी रोहित गुंजाळ याच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने आनंद मोरे आणि रोहित रोकडे अशी मोघम नावे सांगितली. रोहित रोकडे हे त्याने बनावट नाव सांगितले होते. तर आनंद मोरे हा या प्रकरणातील एक आरोपी होता. तोच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याच्या पायात असलेली चप्पल घातलेला एक फोटो पोलिसांना गुंजाळ याच्या फोनमध्ये पोलिसांना मिळाला. पोलिसांचा संशय आणखी बळावला. लागलीच पोलिसांनी आनंद मोरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आनंद मोरे याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्या वाट्याला आलेले दोन लाख 70 हजार रुपये काढून दिले.
बँकेचा शिपाई रोहित गुंजाळ आणि कॅशियर रोहित काटे यांनी अर्धी रक्कम घेण्याच्या अटीवर एटीएम मशीनचा पासवर्ड आणि एटीएम मशीनची बनावट चावी दुसऱ्या दोन आरोपींना दिली. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक करत रोख रक्कम, दुचाकी असा एकूण 3 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.