मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना मलबार हिल परिसरातील अपार्टमेंटमधील भाडे दिले नसल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.
परमबीर सिंह हे 18 मार्च 2015 मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्त झाले. त्यापूर्वी ते मुंबईत स्पेशल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे अॅडिशनल डीजीपी होते. या काळात परमबीर सिंह यांना मलबार हिल्स परिसरातील बीजी खेर मार्गावर असलेले निलिमा अपार्टमेंट हे सरकारी निवासस्थान वास्तव्यास देण्यात आले होते. यानंतर त्यांची नियुक्त ठाणे पोलीस आयुक्तपदी झाली. त्यांना ठाण्यात सरकारी निवासस्थान मिळाले असताना सुद्धा त्यांनी निलिमा अपार्टमेंट खाली केलं नाही.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, परमबीर सिंह यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून 17 मार्च 2015 ते 29 जुलै 2018 पर्यंतचे घरभाडे आणि पेनल्टी जोडून सुमारे 54.10 लाख रुपये थकित देणे आहे. एका रिपोर्टनुसार, 35 आयपीएस अधिकाऱ्यांवर जवळपास 4 कोटी रुपये घरभाडे आणि पेनल्टी दिली नसल्याची माहिती आहे. नियमानुसार एकाचवेळी दोन सरकारी निवासस्थान अधिकाऱ्यांना वापरता येत नाही.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुठल्याही अधिकाऱ्याला दोन सरकारी निवासस्थानात राहता येत नाही. आम्ही हे थकीत घरभाडे आणि पेनल्टी त्यांच्या पगारातून कापून घेऊ आणि जर हे शक्य झाले नाही तर आम्ही जून 2022 मध्ये त्यांच्या निवृत्तीनंतर ही रक्कम वसुल करु.