IPS रश्मी शुक्लांनी 60 दिवस फोन टॅप केल्याची माहिती उघडकीस

0

पुणे : राज्यातील फोन टॅपिंग प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्यातील काही नेत्यांचे फोन टॅप केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि विद्यमान मंत्री बच्चू कडू यांचे फोन टॅप केले.

या नेत्यांचे फोन टॅप करताना त्यांची वेगवेगळी नावे ठेवत 60 दिवस फोन टॅप केल्याची माहिती समोर आली आहे. हे फोन टॅप करताना प्रत्येकाला वेगवेगळी नाव देण्यात आली होती. मात्र, चौघांचे सहा मोबाईल क्रमांक टॅपिंगसाठी पाठविताना संपूर्ण माहिती दिली नसल्यामुळे हे नंबर कोणाच्या नावावर आहेत, हे समजू शकले नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात तार अधिनियमानुसार  शुक्रवारी (दि. 25 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी काही राजकीय नेत्यांचे फोन टॅप करुन त्यांचे संभाषण एका पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पुरवल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती.

या समितीने केलेल्या तपासात हा प्रकार उजेडात आला आहे. समितीचा अहवाल शासनाने स्विकारुन फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला. राजयकीय नेत्यांचे फोन टॅप करताना कोणालाही संशय येऊ नये यासाठी ‘कोडनेम’ देण्यात आले होते.

नेत्यांचे फोन टॅप करताना गुन्हेगारांची नावे देऊन फोन टॅप करण्यात आले. नाना पटोले यांचा क्रमांक अमजद खान या नावाने, विद्यमान शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि आमदार बच्चू कडू यांचा मोबाइल क्रमांक निजामुद्दीन शेख, माजी आमदार आशिष देशमुख यांचा मोबाइल क्रमांक रघू चोरघे आणि हिना साळुंखे या नावाने, तर माजी खासदार संजय काकडे यांचा मोबाइल क्रमांक तबरेज सुतार आणि अभिजित नायर या नावाने टॅपिंगला लावला होता.

नेत्यांचे फोन टॅपिंगला लावताना या कथित गुन्हेगारांचा सहभाग अत्यंत गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांत असल्याचा दावा करण्यात आला होता. या सगळ्यांचे 60 दिवस मोबाईल रेकॉर्डिंगला लावले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यावेळी फोन टॅपिंगची परवानगी घेताना सीएएफ जोडला नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे परवानगी देताना क्रमांक कोणाच्या नावावर आहे, हे लक्षात आले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फोन टॅपिंगला लावलेल्या चार लोकप्रतिनिधींचे मोबाईल सिमकार्ड हे स्वत:च्या नावावर नसल्याचे दिसून आले. तसेच रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात नाना पटोले, बच्चू कडू, संजय काकडे व आशिष देशमुख या तत्कालीन लोकप्रतिनिधींचे फोन राजकीय हेतूने, जाणीवपूर्वक फसवणूक करुन टॅपिंगला लावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.