मुंबई : महाराष्ट्र पोलिस सेवेतील १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय पोलिस सेवेत (IPS) सामावून घेण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी (ता.१४) केंद्र सरकारने हा आदेश काढला.
आयपीएस दर्जा मिळाल्याने या सर्व अधिकाऱ्यांना नव्या आयपीएस अधिकाऱ्यांसारखे एक वर्षे प्रोबेशन पिरीअडवर रहावे लागणार आहे. म्हणजे त्यांचा हा उमेदवारीचा काळ असणार आहे. तसेच नव्या आयपीएस अधिकाऱ्यांप्रमाणे इंडक्शन ट्रेनिंगही त्यांना घ्यावे लागणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या महाराष्ट्र पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांची भारतीय पोलिस सेवेत निवड केली. त्यांचा आदेश केंद्रीय गृह विभागाचे अप्पर सचिव रमन कुमार यांनी काल जारी केला. दरवर्षी राज्य पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना आय़पीएसमध्ये समावून घेतले जाते. त्यानुसार २०१९ साठी या कॅटेगिरीत आठ, तर २०२० ला सहा जागा रिक्त झाल्या होत्या. तेथे या १४ अधिकाऱ्यांची निवड करून त्या भरण्यात आल्या आहेत.
मोहन दहिकर, एन. ए. अष्टेकर, विश्व पानसरे, वसंत जाधव, श्रीमती स्मार्तना पाटील, एस.डी. कोकाटे, पी.एम.मोहिते, संजय लाटकर, सुनील भारव्दाज, एस.डी. कडासने, संजय बारकुंड, डी.एस.स्वामी, अमोल तांबे आणि एस. पी. निशाणदार अशी आयपीएस केडर मिळालेल्या महाराष्ट्र् राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांची नावे आहेत.
हे नोटीफिकेशन जारी झालेल्या दिवसापासून म्हणजे १४ जानेवारीपासूनच आयपीएसमध्ये या सर्वांच्या नेमणूकाही करण्यात आल्या आहेत.याअगोदर पुणे जिल्ह्यातीलच जातेगावचे व पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस उपायुक्त म्हणून काम केलेले शहाजी उमापांसह काही मपोसे अधिकाऱ्यांना अशाप्रकारे भापोसेत समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे.