पुणे : आयर्नमॅन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस आयुक्तालयातून अवघ्या दीड वर्षात कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने सर्वत्र चर्चेचं वातावरण आहे. सध्या पिंपरी चिंचवडचे नुतन पोलीस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आता कृष्णप्रकाश आज (शनिवारी) थेट बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दरबारात दाखल झाले आहेत.
आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश सुटीवर असताना आणि परदेशात गेले असताना अचानक बदली झाल्याने ते तीव्र नाराज आहेत. खरंतर आयुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कृष्ण प्रकाश यांची बदली झाल्याने ते नाराज आहेत. तीच नाराजी व्यक्त करण्यासाठी आज कृष्ण प्रकाश यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या संमतीनेच बदली करण्यात आल्याच्या चर्चेमुळे त्यांनी थेट साहेबांच्या (शरद पवार) यांची भेट घेतली असावी अशी चर्चा आहे.
शनिवारी सकाळीच कृष्ण प्रकाश यांनी थेट बारामतीला जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी त्यांच्यासमोर मांडली असल्याचे समजते. कृष्ण प्रकाश आणि शरद पवार यांच्यात काही वेळ चर्चा देखील झाली. मात्र नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती समोर नाही. संवाद झाल्यानंतर कृष्ण प्रकाश माध्यमांशी न बोलताच निघून गेले. त्यानंतर शरद पवार यांचा ताफा कोल्हापूरकडे निघाला.