पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक जोरात सुरु आहे. पवार यांच्या टिकेवर प्रत्युत्तर देताना पाटील यांनी मोठा आरोप केला आहे. शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून 54 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. अजित दादांनी माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्यात दांभिकपणा आहे, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
त्यावेळी त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमावरुन अजित पवारांवर निशाणा साधला. या निवडणुकीनंतर अजित पवार यांनी नाट्यमयरित्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती.
शरद पवारांच्या विरोधात जात अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. माझ्याकडे आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे, असं अजित पवारांनी त्यावेळी सांगितलं होतं, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. याच मुद्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.