मुंबई : ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट टाकून खळबळ उडवून दिली आहे. मलिकांकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र व भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सतत टीका केली जात आहे. त्यावरून दररोज आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता मलिक वानखेडे यांच्या पत्नी क्रांतीच्या कुटुंबाकडे वळले आहेत.
मलिकांनी सोमवारी सकाळी वानखेडे यांची मेव्हणी व क्रांतीची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर हिच्याविषयी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांनाच एक सवाल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, समीर दाऊद वानखेडे तुमची मेव्हणी हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्ज व्यवसायात सहभागी आहे का? पुणे न्यायालयात तिचं एक प्रकरण प्रलंबित असल्याने तुम्ही याचं उत्तर द्यायलाच हवं, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीशी संबंधांबाबत सुनील पाटील यांनीच केलं ‘दूध का दूध पानी का पानी’!
मलिकांनी ट्विटमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाची माहितीही शेअर केली आहे. त्यानुसार या प्रकरणाची पुणे न्यायालयात 14 जानेवारी 2008 रोजी नोंद झाली आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी 18 फेब्रुवारी 2008 रोजी झाली होती. तर आता 18 मार्च 2022 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले, पुण्याच्या न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यांचा समीर वानखेडे यांच्याशी काय संबंध आहे. मी वानखेडेंना प्रश्न उपस्थित केला आहे. पुढील सुनावणी मार्च 2022 मध्ये आहे का, याची उत्तर वानखेडे यांनी द्यायला हवीत. दरम्यान, मलिक यांनी रविवारी वानखेडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. हॉटेल ललितमध्ये वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या बैठका, पार्ट्या होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात भाजपचे नेते मोहित कंबोज हेच मास्टरमाईंड असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आर्यनचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा त्यांना प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी भाचा ऋषभ सचदेवाच्या माध्यमातून ट्रॅप लावला होता. पण एका सेल्फीने त्यांचा खेळ उघडकीस आल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. कंबोज यांनी हे आरोप फेटाळून लावत मलिकांवर टीकास्त्र सोडलं.