मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे की खोटा?, याचा आधी शोध घ्या. त्यानंतर तो व्हिडिओ मॉर्फ केला आहे की नाही?, याचा तपास करा, अशी खोचक मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, व्हायरल व्हिडिओत असलेल्या पुरुष आमदाराचे काय म्हणणे आहे?, हेही एकदा जाणून घ्यायला हवे. याबाबत आतापर्यंत त्यांनी काहीच तक्रार केलेली नाही. त्यांची याबाबत काहीच तक्रार नाहीये का? अशा व्हिडिओंमुळे केवळ महिलांचीच बदनामी होते का? पुरुषांची बदनामी होत नाही का?, असा टोला संजय राऊतांनी प्रकाश सुर्वेंना लगावला.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओवरुन ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, संपूर्ण देशभरात ती चित्रफीत व्हायरल झाली आहे. लाखो लोकांनी ती चित्रफीत बघितली आहे. मग काय लाखो, कोट्यवधी लोकांना अटक करणार आहात का? तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे. त्यावर एसआयटी स्थापन करावा, अशा अनेक गोष्टी सध्या राज्यात घडत आहेत. मात्र, काही गोष्टी केवळ राजकारण आणि सुडापोटी केल्या जात आहेत, अशी टोला संजय राऊतांनी लगावला.