पिंपरी : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताच शहरात अवैध धंदे चालू देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षभरात तब्बल 285 जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारले आहेत. यावरून स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादने सर्व धंदे सुरु होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हद्दीत अवैध धंदे आढळल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे आता नक्की काय होणार हे पाहणे योग्य ठरणार आहे.
सप्टेंबर महिन्यात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्त पदाची धुरा हाती घेतली. त्यानंतर त्यांनी लगेच गुन्हेगार, अवैध धंदे चालकांना सज्जड दम देत ‘मी शहरात असेपर्यंत दुसरे धंदे शोधा’ असा सल्ला दिला. मात्र पोलीस आयुक्तांच्या आदेशाला बहुतांश अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आणि शहरातील अवैध धंदे जोमात सुरू राहीले. आयुक्तांनी अवैध धंद्यांवर वचक निर्माण करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना केली. स्थानिक पोलिसांच्या अगोदर सामाजिक सुरक्षा विभागाला अवैध धंद्यांची माहिती मिळू लागली आणि त्यावरील कारवाईला वेग आला.
आपल्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांची माहिती अपल्या अगोदार सामाजिक सुरक्षा विभागाला मिळत असल्याने स्थानिक पोलिसांनी देखील कंबर कसली आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले. सन 2019 साली 237 जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारले. त्यानंतर हे प्रमाण वाढून 254 एवढे झाले. त्यात आणखी वाढ होऊन मागील वर्षी 285 जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारले आहेत. ऑगस्ट आणि नोव्हेंबर वगळता प्रत्येक महिन्यात 20 पेक्षा अधिक जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई झाली आहे. दररोज पडणारे छापे, एकदा कारवाई होऊनही न सुधारणारे नागरिक यामुळे शहराच्या प्रतिमेला डाग लागत आहे. हा डाग पुसण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
वर्षभरात पोलिसांनी केलेली कारवाई –
जानेवारी – 25
फेब्रुवारी – 36
मार्च – 36
एप्रिल – 24
मे – 20
जून – 21
जुलै – 23
ऑगस्ट – 15
सप्टेंबर – 27
ऑक्टोबर – 20
नोव्हेंबर – 18
डिसेंबर – 20