मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील ‘शिंदे’गट-भाजप आघाडी सरकारला उणापुरा एक महिना पूर्ण होत आला आहे. पण अद्याप या सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला नाही. या प्रकरणी विरोधकांची चौफेर टीका सुरू असताना शिंदेंनी गुरूवारी येत्या 3 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
शिंदे म्हणाले -‘या प्रकरणी काहीसा विलंब झाला आहे. पण कोणत्याही पातळीवर कोणताही वाद नाही. आम्ही पुढील 3 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करू. सदस्यांच्या निवडीत कोणताही भेदभाव करण्यात आला नाही. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ खूप चांगले असेल.’
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंबंधी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी दिल्लीला जाणार होते. पण शेवटच्या क्षणी त्यांनी आपला दौरा रद्द केला. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात जवळपास 45 मंत्री असतील. त्यात 25 भाजपच्या कोट्यातून, 13 शिंदे कोट्यातून तर 7 अपक्ष आमदारांचा समावेश असेल.