मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात पोलिसांनी केलेल्या कृत्याचे पडसाद विधीमंडळात उमटले. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी विनंती गृहमंत्र्यांकडे केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर नियमाने कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे.
जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. त्यानंतर नियामानुसार दोषींवर कारवाई होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितलं.
जळगावच्या आशादीप वसतीगृहातील महिला आणि मुलींना काही जणांनी डान्स करायला लावल्याचा प्रकार समोर आला होता. या महिलांनी घडलेल्या प्रकाराची शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्याने ही संपूर्ण घटना उघडकीस आली. या महिलांनी आपल्यावर अन्याय, अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करत असल्याचं म्हटलं आहे.
इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घटनेचा संदर्भात आपल्याकडे काही जणांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार आपण चौकशी समिती गठीत केली असून ही चौकशी समिती संपूर्ण घटनेचा तपास करून अहवाल देणार आहे. या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.