नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. 24) जम्मू दौरा करणार आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ हटविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जम्मूचा दौरा करणार आहेत. दरम्यान या दौऱ्याच्या दोन दिवस अगोदर जम्मूमधील सुंजवान कॅन्टोन्मेंट येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात एक जवान शहीद झाला असून चारजण जखमी झाले आहेत. तर दोन दहशतवादी यात मारले गेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी ही चकमक झाली आहे. पंतप्रधान मोदी रविवारी जम्मूला येथे एका मोठ्या रॅलीला संबोधित करतील. ज्यात पल्ली गावात हजारो पंचायत सदस्य सहभागी होतील. त्यांच्या दौऱ्याच्या अगोदर येथे हाय अलर्ट ठेवण्यात आला असून सुरक्षा दलांकडून चोवीस तास गस्त घातली जात आहे.
जम्मू आणि काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंग म्हणाले, “सुंजवान चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुंजवानमध्ये लपलेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. सुरक्षा दलांना जास्तीत जास्त जीवितहानी करणे हा त्यांचा उद्देश होता.”
J&K | Two terrorists have been neutralised in an ongoing encounter that broke out between terrorists and security forces in Jammu’s Sunjwan area earlier today
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/3fgYs9y5dQ
— ANI (@ANI) April 22, 2022
जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग म्हणाले, “आम्हाला माहिती मिळाली की दहशतवादी येथे लपून काही योजना आखत आहेत. आम्ही रात्रीच्या वेळी परिसराला वेढा घातला. सकाळी गोळीबार सुरू होता. ज्यामध्ये सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून चार जण जखमी झाले आहेत.”
“दहशतवाद्यांनी सकाळी सीआयएसएफच्या बसवर हल्ला केला. ज्यामध्ये 15 सैनिक होते. सीआयएसएफने प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना पळून जाण्यास भाग पाडले. या कारवाईत सीआयएसएफचा एक अधिकारी ठार झाला तर दोन जण जखमी झाले असल्याचे सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.