जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याकडे दिला राजीनामा

0

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपच्या पदाधिकारी महिलेच्या तक्रारीवरून आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, यासाठी त्यांची समजूत घालण्यासाठी जयंत पाटील आज मुंबईला आले. मात्र, आपण राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार परिषदेत आपले म्हणणे मांडताना आव्हाड भावूक झाले. आव्हाड म्हणाले, माझ्यावर एकवेळ खुनाचा गुन्हा दाखल झाला तर चालेल, पण विनयभंगाचा गुन्हा चालणार नाही. अशा आरोपांमुळे समाजात माझी मान खाली जात आहे. महाराष्ट्रात अतिशय खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे अशा राजकारणात न राहिलेले बरे.

आव्हाड म्हणाले, हर हर महादेव चित्रपटावरूनही माझ्यावर खोटे आरोप झाले. खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्याविरोधात मी लढण्यास सक्षम आहे. मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे. मात्र, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर मी कुणाविरोधात लढू. ज्या महाराष्ट्रात परस्त्रीला मातेसमान मानले जाते, अशा महाराष्ट्रात असा आरोप होणे, माझ्यासाठी अतिशय मानहानीकारक आहे. त्यामुळे मी हे सहन करू शकत नाही.

जयंत पाटील म्हणाले, पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. पोलिस बुध्दी गहाण ठेवून विरोधकांवर कारवाई करत आहे. पोलिसांचा असाच गैरवापर होत राहिला तर सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास उडेल. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, अशी आमची भूमिका आहे. यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा करून निर्णय घेऊ.

जयंत पाटील यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या घटनेवरून आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या घटनेचा व्हिडिओ मी पाहिला आहे. त्यात कुठेही विनयभंगाच्या उद्देशाने जितेंद्र आव्हाडांनी ती कृती केल्याचे दिसत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.