पंढरपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. ४ नोव्हेंबर) पहाटे चारच्या सुमारास कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) आणि कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला.
महापूजेचा मान मिळालेले साळुंखे पती-पत्नी गेली ५० वर्षे पंढरीची वारी करत आहेत. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. श्री विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळालेले फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. ही पांडुरंगांचीच कृपा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महापूजेसाठी रात्री १२ वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.
महापूजेच्या वेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, हरिभाऊ बागडे, बनन पाचपुते, समाधान अवताडे, गोपीचंद पडळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक श्री संत नामदेव वाड्याला भेट देऊन नामदेवरायांचे दर्शन घेतले. नामदेव महाराजांच्या १७ व्या वंशजांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामदेव पगडी घालून सत्कार केला. यावेळी अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळली.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘पांडुरंगाने शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर करावीत. शेतकरी आणि कष्टकरी सुखी करण्यासाठी आम्हाला पांडुरंगाने शक्ती, आशीर्वाद आणि सुबुद्धी द्यावी. सर्वांना विश्वासात घेऊन आणि कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन पंढरपूरच्या विकास आराखड्याचे काम हातात घेऊ.’
संत नामदेव महाराजांच्या ७५२व्या जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान सायकल यात्रेचा शुभारंभ यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री नामदेव पायरी श्री विठ्ठल सभामंडप श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. १५ प्रकारची सहा टन फुले वापरून ४० कारागिरांनी ही सजावट केली आहे.
परतीच्या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला. त्याचा परिणाम पंढरपुरातील कार्तिकी यात्रेवर झाला असून भाविकांची संख्या कमी झाली आहे.