मुंबई : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले.
महाराष्ट्राने आता ३८ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ३१ कांस्यपदके मिळवत १०३ पदकांसह आघाडी कायम राखली आहे. हरियाना, मध्य प्रदेश यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच कायम आहे. हरियाना (२५, २०, १८) अशा ६३ पदकांसह दुसऱ्या, तर मध्य प्रदेश (२५, १३, २३) अशा ६१ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राला बुधवारी जलतरण आणि सायकलिंगच्या सुवर्णपदकांनी बाजू भक्कम करता आली. अपेक्षा फर्नांडिसने जलतरणात, तर पूजा दानोळेने सायकलिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक साजरी केली.
महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिसने आज दोन, तर वेदांत माधवने एक सुवर्णपदक मिळवत आपली सुवर्णपदकांची संख्या वाढवली. अपेक्षाने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात २ मिनिट ३९.८७ सेकंद अशी वेळ देत हे यश मिळविले. पाठोपाठ अपेक्षाने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट ०३.६९ सेकंद वेळ देत दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. वेंदातने आपल्या २०० मीटर फ्री-स्टाईलच्या सुवर्णपदकात आज १५०० मीटर फ्री-स्टाईल प्रकारात बाजी मारली. त्याने १६ मिनिटे १६.७४ सेकंद अशी वेळ दिली. १०० मीट बॅक स्ट्रोक शर्यतीत प्रतिक्षा डांगीने १ मिनिट ०८.९२ सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळविले. याच प्रकारात कोल्हापूरची भक्ती वाडकर १ मिनिट ०९.२३ सेकंदासह ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. मुलींच्या चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत अनन्या नायक, दिप्ती तिलक, पलक जोशी, अपेक्षा फर्नांडिस या चमूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या चमूने ४ मिनिट ०६.७१ सेकंद अशी वेळ दिली.कर्नाटकाने ४ मिनिट ०६.१० सेकंदासह सुवर्णपदक पटकावले.
वेटलिफ्टिंगमध्ये आज तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राला निकिता कमलाकरने मुलींच्या विभागातून सुवर्ण, तर साईराज परदेशीने मुलांच्या विभागातून ७३ किलो वजन गटात कांस्यपदक मिळविले. साईराजने स्नॅचमध्ये ११५ आणि क्लिन-जर्कमध्ये १४७ असे एकूण २६२ किलो वजन उचलून कांस्य पदक मिळविले. स्नॅचमध्ये ११८ किलो वजन उचलताना दोन वेळा साईराजचा प्रयत्न अपयशी ठरला. दिल्लीच्या शिवा चौधरीने ११९ आणि १५० असे एकूण २६९ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. आसामचा प्रबल गोगोई (२६५ किलो) कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्यापूर्वी निकिता कमलाकरने ५९ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ७३ आणि क्लिन-जर्कमध्ये १०४ असे १७७ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. निकिताने स्नॅचमध्ये दुसऱ्या ७२ किलोच्या प्रयत्नानंतर तिसऱ्या प्रयत्नांत ७५ किलो वजन उचण्याचा प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला. क्लिन-जर्कमध्ये निकिताने दुसऱ्या ९९ किलोच्या प्रयत्नांनंतर थेट ५ किलो वाढवून १०४ किलो वजन यशस्वी उचलले. हीच कामगिरी निर्णायक ठरली. कारण स्नॅचमध्ये निकिता चौथ्या क्रमांकावर राहिली होती.
हरजित कौरच्या खोलवर चढाया आणि तिला याशिका पुजारी, मनीषा, समृद्धीकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने जगड्या हिमाचल प्रदेश संघाचे आव्हान ४४-३१ असे परतवून लावत कबड्डीत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेतेपदाच्या लढतीत महाराष्ट्राची गाठ हरियानाशी पडणार आहे. हरियानाकडून स्पर्धेत साखळीतील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर हरियानाने प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा अक्षरशः धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत तर त्यांनी बिहारवर एकामागून एक सात लोण चढवले. यावरून त्यांच्या आक्रमकतेची कल्पना येईल. मुलांना उपांत्य फेरीत कबड्डीत हरियानाकडून ५०-३५ अशी हार पत्करावी लागली. या पराभवामुळे मुलांना ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्राच्या समृद्धि घोरपडे (४६ किलो), उत्कर्ष ढमाळ (५१ किलो) आणि महादेव (६० किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जबरदस्त लढती करंडत अंतिम फेरी गाठणाऱ्या समृद्धिला सुवर्ण लढतीत हरियानाच्या मुस्कानने १२-६ असे हरवले. याच गटात ब्रॉंझपदकाच्या लढतीत तृप्तीने दिल्लीच्या ज्योती कुमारीला ४-० असे हरवले. उत्कर्षला छत्तीसगडच्या मनु यादवकडून गुणांवर मात खावी लागली. महादेवही हरियानाच्या आशिषकुमारकडून गुणांवर पराभूत झाला. याच गटात प्रणय चौधरीने उत्तर प्रदेशाच्या जुबेरला ६-५ असे हरवून ब्रॉंझपदक मिळविले.