खोके सरकारचं परराज्यातल्या निवडणूकांवर लक्ष : आदित्य ठाकरे

0

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री गुजरात निवडणूकांच्या प्रचारात व्यस्त असल्याने बुधवारी कॅबिनेटची बैठक रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

‘महाराष्ट्रातील खोके सरकार गुजरात निवडणूीकीच्या प्रचारात व्यस्त आहे’, अशी टीका त्यांनी केली आहे. सोबतच त्यांनी खोके सरकारला काही सवालही केले आहेत.

‘महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने शिवसेनेचे आमदार गुजरातला पळवले,मग हक्काचे प्रकल्प गुजरातला नेऊन इथल्या तरुणांचा रोजगार पळवला.आता तिथल्याच निवडणुकीच्या प्रचारात हे सरकार व्यस्त आहे. एक तासही यांच्याकडे नाही.’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी ‘काल मंत्रीमंडळाची बैठक का रद्द झाली? पीक विमा,ओला दुष्काळ,वीज प्रश्न अश्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून परराज्यातल्या निवडणुकांवर खोके सरकार लक्ष केंद्रित करतंय. मंत्रीमंडळ बैठक रद्द होतेय.महाराष्ट्रात हे काय चाललंय? हे सरकार नेमकं आहे कुणासाठी? या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वेळ मिळणार आहे का?’, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी राज्याच्या औषध खरेदीवरूनही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘महामंडळ’ की ‘प्राधिकरण’? अश्या गोंधळात खोके सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. औषध पुरवठ्याचा प्रश्न सोडून यांना निवडणूकांची काळजी जास्त हे दिसतंय. तुम्ही शिवसेनेशी, शिवसैनिकांशी गद्दारी केलीत, पण महाराष्ट्रासोबत गद्दारी करू नका!’ अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारला फटकारले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.