खंडणीसाठी चिमुकल्याचे अपहरण करून खून ; गुंडा विरोधी पथकाने काही तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

0

पिंपरी : आदित्य याचा खून त्याच्याच बिल्डींगमध्ये राहणाऱ्या मंथन भोसले या इंजिनीयर तरूणाने केला. त्यासाठी मंथन याने त्याची कुशलता पणाला लावली होती. अगदी सुरुवातीला पोलिसांना सहकार्य करण्याचे नाटकही त्याने केले, मात्र सत्य कधी लपत नाही म्हणतात त्या प्रमाणे मंथन याचे पितळ अखेर उघडे पडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य याचे अपहरण करण्याचे मंथन याने 15 दिवसांपासून ठरवले होते. यासाठी त्याने त्याचा शाळेतला मित्र अनिकेत समदर यालाही बोलावून घेतले. समदर भोसलेच्या मदतीला धावून येण्याचे कारणही तसेच होते. मंथन हा बारावी झालेला असला तरी अनिकेत मात्र बारावीच शिकला होता. त्याने एका नेपाळी मुलीशी लग्न केले व मुंबईला स्थलांतरीत झाला. मात्र, लग्नानंतर त्याला पैशांची गरज भासत होतीच. याच गरजेला मंथनने पैशांचे आमिष दाखवले. म्हणजे ओगले कुटुंबीयावरचा रागही निघेल आणि पैसेही मिळतील.

यासाठी त्याने मागील पंधरा दिवसांपासून कट रचन्यास सुरुवात केली. वडिलांची कार घेतली. तिच्या काचांना काळ्या फिती लावल्या, मित्रही तोपर्यंत पिंपरीत आला होता. सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नाहीत असा पार्किंगचा कोपरा हेरून ठेवला. आता वेळ होती आदित्यचे अपहरण करण्याची! त्यासाठी दोन वेळा प्रयत्नही केले, मात्र ते फसले. मग अजून थोडा अभ्यास केला असता आदित्य याची आत्या त्या बिल्डींगमध्ये रहाते व तिचा आदित्यवर विशेष लळा होता हे मंथनला माहिती झाले. याचाच फायदा घेऊन गुरुवारी आदित्य खाली खेळायला येताच अनिकेत याने आदित्यला आत्याने बोलावले आहे, म्हणून सोबत गाडीजवळ नेले. गाडीत बळजबरी बसवताना आदित्यने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी मंथन याने रागाने आदित्यचे तोंड दाबले व एका हाताने त्याचा गळाही दाबला. यात आदित्यचा मृत्यू झाला.

मंथन व त्याचा मित्र यांना गांजा सिगारेट याचेही व्यसन असल्याचे समोर आले. यासाठी तो व त्याचे मित्र एमआयडीसी भोसरी येथे बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात व्यसन करण्यासाठी जात होते. त्याच बिल्डींगच्या छतावर आदित्यचा मृतदेह गोणीत भरून फेकून देण्यात आला.

दरम्यान, पोलिसांपर्यंत गोष्ट गेली असता पोलीस सोसायटीमध्ये चौकशीसाठी आले. तोपर्यंत मंथन मृतदेहाची विल्हेवाट लावून बिल्डींगमध्ये परत आला होता. यावेळी पोलिस चौकशी करत असताना तो त्यांच्या आसपास फिरकत सहकार्य करण्याचे नाटक करत होता. पोलिसांची उशिरापर्यंत तपासणी सुरु असताना तो तेथून चिखली येथे एका मोबाईलच्या दुकानात गेला. तिथे एक कामगार त्याचा मोबाईल घेऊन आला होता. यावेळी त्याने त्याचे चलाख डोके वापरून त्या कामगाराला माझा माबाईल हँग झाला आहे, मला थोडं मोबाईलचे काम आहे सांगून मोबाईल घेतला. त्या कामगाराच्या फोनवरून त्याने आदित्यच्या बाबाला रात्री एक वाजता 20 कोटींची खंडणी मागितली. या एसएमएसने पोलिसांची तपासाची दिशाच फिरली. तरी पोलिसांचे एक पथक सोसायटीतील सर्वांची कसून चौकशी करत होते. माहिती घेत होते.

यावेळी मंथनच्या वडिलांनी पोलिसांना माहिती देताना मंथन व ओगले कुटुंबीयांचे काही महिन्यांपूर्वी जोरदार भांडण झाले होते. तो सोसायटीत सर्वांना थोडा त्रास देत होता यासाठी त्याला सहा महिन्यांसाठी मामाच्या गावाला सोडल्याचेही त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर प्रकरण मिटले असे सर्वांना वाटले होते. याचाच आधार घेऊन पोलिसांनी मंथनला चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याची उत्तरे काही विसंगत वाटत असल्याने पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. ओगले यांच्यावरील राग तसेच 20 कोटी मागितले, तर किमान तीन ते चार लाख तरी मिळतील म्हणून हा कट रचल्याचे त्याने कबुल केले. मात्र, या घटनेने केवळ ओगले कुटुंब नाही तर मंथनचे भोसले कुटुंब व पूर्ण सोसायटी हादरली आहे. त्यामुळे आपले मुल नेमके काय करत आहे? याकडे प्रत्येक पाल्याने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

अवघ्या काही तासातच आरोपीपर्यंत पोहचत गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.