पिंपरी : चिखली येथे आठ वर्षांच्या मुलाचा दगडाने ठेचून खून केलेल्या प्रकरणाचे कारण समोर आले आहे. एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करुन, डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बपील अहमद रईस लष्कर (26, रा. हरगुडेवस्ती, कुदळवाडी, चिखली मुळगाव आसाम) असे अटक आरोपीचे नाव आहे.
लक्ष्मण बाबुराम देवासी (8, रा. हरगुडे वस्ती, चिखली मुळगाव राजस्थान) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील 83 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासणी करुन, तांत्रिक विश्लेषण करत संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
आठ वर्षीय मुलाच्या आई वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करुन त्याला पत्र्याच्या शेडमध्ये नेले. मुलगा आरडाओरडा करु लागल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केला. अशी कबुली आरोपीने दिली.
दरम्यान, आठ वर्षीय मुलाचा खून कोणत्या कारणातून झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. पोलिसांनी केलेल्या तपासातून यावर पडदा पडला असून, खंडणीच्या मागणीसाठी खून केला असल्याचे उघडकीस आले आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरीश माने, अशोक डोंगरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.