पिंपरी : वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची हिंजवडी पोलिसांनी वेशांतर करुन सुखरुप सुटका केली. पोलिसांनी कारला घेरुन तीन जणांना अटक केली आहे.
हा प्रकार हिंजवडी फेज 2 येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. पोलिसांनी अवघ्या 6 तासात तरुणाची सुखरुप सुटका केली.
याबाबत मुलाच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ज्ञानेश्वर चव्हाण (23) व लखन चव्हाण (26, दोघे रा. वरुड ता. पुसद, जि. यवतमाळ) त्याशिवाय लक्ष्मण डोंगरे (22, रा. बोडकेवाडी, मूळ रा. घाटोळी, जि. यवतमाळ) या तिघांना अटक केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी फिर्यादी महिलेच्या मुलाची पाणीपुरीची गाडी आहे. फेज दोन हिंजवडी येथे तो पाणीपूरीचा व्यवसाय करतो. 2 जुलैच्या रात्री नऊ वाजले तरी तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध केली, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे आईने पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान बेपत्ता असलेल्या तरुणाच्या वडिलांना फोन आला. आम्ही तुमच्या मुलाचे अपहरण केले असून त्याला सुखरुप सोडण्यासाठी 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली.
वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने तपास सुरु केला. कोणतीही माहिती नसल्याने तपासात अडचण येत होती. त्याच वेळी त्या तरुणाला घेऊन एक कार अहमदनगरच्या दिशेने गेली असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अहमदनगरच्या दिशेने रवाना झाले.
अहमदनगर रस्त्याने जात असताना शिक्रापूर येथे रस्त्याच्या कडेला एक संशयित कार दिसली. पोलिसांनी लांबून टेहाळणी केली असता तीच कार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र अपहरण करणाऱ्यांकडे हत्यारे असल्याने तरुणाच्या जीवाला धोका होता. हे लक्षात घेऊन पोलिसांनी वेशांतर करुन चारी बाजूने एकाचवेळी झडप घातली. क्षणाचाही विलंब न करता त्या तरुणाला सुखरुप बाहेर काढले. अचानक पोलीस आल्याने आरोपीनी पाळायचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिघांना पकडून त्यांच्याकडून हत्यारे जप्त केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. मुगळीकर, सोन्याबापू देशमुख, सुनील दहिफळे, तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, तुकाराम खडके, उपनिरीक्षक रमेश पवार आणि त्यांच्या पथकाने केली.