पैश्यांसाठी मित्राचा खून करुन मृतदेह जाळला; ब्लूटुथवरून लागला छडा

0

पिंपरी : खून करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला. कोट्यावधी रुपये मिळण्यासाठी मित्राचा खून करुन, मृतदेह जाळण्यात आला आणि तो व्यक्ती आपण स्वतः चा असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ब्लूटुथवरून खुनाचा छडा लावला आहे.

संदीप पुंडलिक माईनकर असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मेहबूब दस्तगीर शेख याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने लावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्याच्या बाणेरमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला होता. तेव्हा, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने निरीक्षण केले असता मयत व्यक्तीच्या खिशात एक अर्धवट जळालेली चिठ्ठी मिळाली. तसेच घटनास्थळी कानातील ब्लूटुथही मिळाले. चिठ्ठीवरून मयत व्यक्तीचे नाव संदीप असल्याचं समोर आलं.

ब्लूटुथ कोणाचे यावरून आरोपीचा शोध सुरू झाला. त्याचदरम्यान काळेवाडी येथून आरोपीच्या पहिल्या पत्नीने मेहबूब हा बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. संबंधित घटनेविषयी पत्नीला काहीच माहिती नव्हती. अखेर, पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन ब्लूटुथचा तपशील आणि इतर चौकशी केल्यानंतर आरोपी हाच असल्याचं उघड झालं. तसेच आरोपीवर कोट्यवधींचे कर्ज होते शिवाय दोन बायका असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे आरोपी असं कृत्य करू शकतो अशी खात्री पोलिसांची झाली.

पोलिसांना तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी सध्या दिल्लीमध्ये असल्याचं समजलं. हिंजवडी पोलीस दिल्लीला रवाना झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी हा दुसऱ्या पत्नीसोबत पुण्यात आला होता. दौंड परिसरात रेल्वेतूनच आरोपीला गुन्हे शाखा युनिट चार आणि हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, आरोपी मेहबूबकडे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मी कर्जबाजारी झालेलो असून माझा शेवट करत आहे. माझा मृतदेह बाणेर भागात मिळेल असे लिहिले आढळले आहे.

आरोपी आणि मयत हे दोघे ही काही वर्षांपूर्वी एका कंपनीत कामाला होते त्यांची ओळख होती. याचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्याचा खून करून आपण स्वतः असल्याचं पोलिसांना भासवून कोट्यवधींच्या कर्जापासून मुक्तता मिळेल अस वाटलं होतं. मात्र त्याचा डाव फसला. गुन्ह्याचा तपास आणि आरोपीला अटक करण्याची कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखा युनिट चारचे प्रसाद गोकुळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे यांच्यासहीत त्यांच्या पथकातील कर्मचारी सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.