बिझनेसमन असल्याचे सांगून शेकडो तरुणींना गंडा घालणारा ‘लखोबा लोखंडे’ गजाआड

0

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून देशभरातील 100 पेक्षा अधिक तरुणींना फसवणाऱ्या ‘लखोबा लोखंडे’ला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने कोट्यवधी रुपयांना तरुणींना फसवल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज थेवराज डिक्रूझ असं या लखोबा लोखंडेचं नाव आहे. तो मुळचा तामिळनाडू इथं राहणार आहे. प्रेमराजने शेकडो महिलांना लग्नाचं आमिष दाखवून कोट्यवधींची माया जमवली आहे.

अत्यंत सॉफिस्केटेड दिसणारा प्रेमराज हा अविवाहित आणि खासकरून विधवा, परित्यक्ता महिलांना हेरून त्यांना आपल्या प्रेमात पाडायचा. मी काँट्रॅक्टर आहे ,बिझनेसमन आहे, बिल्डर आहे असं खोटं सांगून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्याचा प्रेमाचा ड्रामा सुरू व्हायचा. पुढे जाऊन त्याने अनेक जणींसोबत साखरपुडाही केला. एवढंच नाहीतर लग्नाचं आमिष दाखवून त्या महिलांकडून लाखो रुपये उकळायचा.
अशाच प्रकारे डिक्रूझने देशभरात सुमारे100 पेक्षा अधिक महिलांचा विश्वासघात केला.

एका महिलेने पोलिसांकडे डिक्रूझ विरुद्ध तक्रार केली. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि डिक्रूझच्या साळसूदपणाचा बुरखा फाडून त्याचा विकृताचा चेहरा समोर आणला. पोलिसांनी जेव्हा त्याला पकडण्यासाठी सापळा रचला, तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठी महिलेने ठरलेल्या इशाऱ्या प्रमाणे चेहऱ्यावरील केस तीन वेळा मागे घेतले आणि आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं.

पुणे, ठाणे, मालाड, मुंबई, तामिळनाडू, चेन्नई, गुजरात अशा अनेक ठिकाणी डिक्रूझने अनेकजनींना फसविल्याच्या तक्रारी आता दाखल होत आहे. त्यातच अटक केल्यानंतर डिक्रूझकडे 7 मोबाईल, 32 सिमकार्ड, दोन पॅन कार्ड, दोन आधारकार्ड आणि आणि बनावट पासपोर्टसह अनेक कागदपत्रे मिळून आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहेच हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळं उखडून टाकण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.